Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

मुंबईतील विधान भवन परिसरात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
विधानभवन, मुंबई
विधानभवन, मुंबई
Published on

मुंबईतील महाराष्ट्र विधान भवन परिसरात बुधवारी धक्कादायक प्रकार घडला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्...

ही घटना आज बुधवार, ११ मार्च रोजी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, दादासो बबन कलसैत (वय ३८) असे या व्यक्तीचे नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. कलसैत यांनी उषा मेहता चौक परिसरात स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले. त्यानंतर त्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लोहार समाजाच्या जमिनीवर अनधिकृतपणे उभारलेला विश्वकर्मा यांचा पुतळा नगरपंचायतीने हटवला होता. या घटनेमुळे काळसैत नाराज आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२६ अंतर्गत नॉन-कॉग्निजेबल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in