अटल सेतूवर सेल्फी, हौशा-नवशांवर कारवाई

अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी अटल सेतूवर विनाकारण न थांबण्याची विनंती केली आहे.
अटल सेतूवर सेल्फी, हौशा-नवशांवर कारवाई

उरण : न्हावा शेवा-शिवडी सी-लिंक (अटल सेतू)वर काही वाहनचालक आपली वाहने थांबवून सेल्फी (फोटो) काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होणार असल्याने अशा वाहनांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, न्हावा शेवा-शिवडी सी-लिंकवर कोणत्याही प्रकारची वाहने थांबवू नयेत, असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.

मुजावर यांनी सांगितले की, न्हावा शेवा-शिवडी सी-लिंक (अटल सेतू) चे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या पुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनांस प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.तसेच पुलावर चारचाकी वाहनांकरिता वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास इतकी ठेवण्यात आली आहे. पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील पोलिसांच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक वाहनचालक आपली वाहने अटल सेतूवर पार्क करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत. या प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क केलेल्या व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण १४४ वाहनचालकांविरुद्ध कलम १२२/१७७ मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गस्ती पथकांची नेमणूक

अटल सेतूवर विनाकारण थांबलेल्या लोकांना हटविण्यासाठी दोन गस्ती पथके नेमण्यात आली असून, जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल, त्या व्यक्तीवर व वाहनचालकाविरुद्ध यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी अटल सेतूवर विनाकारण न थांबण्याची विनंती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in