प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री महागात

१६८ जणांविरोधात गुन्हा; पाच दिवसांत १३ लाखांचा दंड
प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री महागात

मुंबई : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या विरोधात पाच दिवसांत केलेल्या कारवाईत १६८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पाच दिवसांच्या कारवाईत १३ लाखांचा दंड वसूल केला आहे. सोमवार २१ ते २५ ऑगस्ट या पाच दिवसांत ६०१८ ठिकाणी भेटी देण्यात आल्या असून, ५९३.३०५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली असून, या अधिसूचनेनुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घातली आहे. शिवाय केंद्र शासनानेही सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली आहे.

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ अंतर्गत प्रतिबंधित वस्तूंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणीला बंदी आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कार्यक्षेत्रात पर्यावरण विभागाच्या सुचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस खात्यासोबत समन्वयाने मुंबई पालिका प्रशासनाने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. यानुसार सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिकची आवरणे यांच्यासह प्लॅस्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या आणि प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी)ला बंदी घालण्यात आला आहे.

या प्लास्टिकवर बंदी!

-सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या)

-नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स - ६० ग्रॅम प्रति चौरस मीटर (स्क्वेअर मीटर) (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या

- प्लास्टिक डिश, बाऊल, कॅन्टेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, स्टिरर्स, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी (कंटेनर व बाउल)

- प्लास्टिक कोटिंग तसेच प्लॅस्टिक थर असणाऱ्या पेपर/अॅल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादी.

...तर २५ हजारांचा दंड

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in