एकनाथ शिंदेसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा,सेनेची मागणी

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘१२’ हा आकडा सतत चर्चेत राहिला आहे
एकनाथ शिंदेसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा,सेनेची मागणी
Published on

महाराष्ट्रातील सत्तानाट्य दिवसभर नवनवी वळणे घेत असताना आता शिवसेनेने नवी खेळी करीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका सादर केली आहे. या १२ आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, गटनेता, प्रतोद कोण यावरुन वाद सुरु झाला आहे. गुरुवारी दुपारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेला प्रतोद नियुक्तीचा दावा फेटाळला आणि आता शिवसेनेने थेट १२ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची याचिका सादर केली आहे.

पुन्हा ‘१२’ ची खडाखडी

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘१२’ हा आकडा सतत चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे विधानसभेतील गोंधळामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आता शिवसेनेने थेट १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका सादर केली आहे. यामुळे सत्ता नाट्य आणखी रंगतदार होऊ लागले आहे. या बाबात दोन्ही बाजूने कायद्याचा किस पाडला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in