नालेसफाईचे फोटो पाठवा, पण वेबसाईट बंद!

नालेसफाईचे १०० टक्के टार्गेट पूर्ण -पालिकेचा दावा
File Photo
File Photo
Published on

आपल्या प्रभागातील नालेसफाई पूर्ण झाली नसल्यास त्याची तक्रार पालिकेच्या वेबसाईटवर करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तक्रार करण्यासाठी वेबसाईट २५ मेपासून कार्यान्वित होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र वेबसाईट अद्याप तरी बंद असल्याने तक्रार करायची कुठे, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ३१ मे नालेसफाईचे १०० टक्के टार्गेट यंदा आठ दिवस आधीच पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

नालेसफाई ‘३१ मे डेडलाइन’च्या आठवडाभर आधीच पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. पालिकेने निश्चित केलेल्या ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळापैकी गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

प्रत्येक कामांचे चित्रीकरण!

नालेसफाई परिणामकारक होण्यासाठी छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर डंपिंग ग्राऊंडवर आलेल्या व जाणार्‍या डंपर वाहनांच्या क्रमांकाची, वेळेची नोंद करणे, डम्पिंग ग्राऊंडवर येणार्‍या जाणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांची आहे.

गाळ काढल्याचे प्रमाण

मुंबई शहर - ३५७७६.३० मेट्रिक टन

पूर्व उपनगर - ११९९३५.६१ मेट्रिक टन

पश्चिम उपनगर - १९५५४६.०८ मेट्रिक टन

मीठी नदी - १९६४७८.०९ मेट्रिक टन

छोटे नाले - ३८६८९२.७६ मेट्रिक टन

logo
marathi.freepressjournal.in