मुंबई : अंधेरीतील अपघाताच्या एका घटनेत निकिता विरू सिंग या २१ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा मित्र आदेश विजय देवळेकर याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मद्यप्राशन करून दुचाकी चालवून निकिताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकणी आदेशविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
४५ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी येथे राहत असून ती होली स्पीरिट हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. १६ मार्चला सकाळी साडेपाच वाजता निकिता ही तिचे दोन मित्र आदेश देवळेकर आणि सुरज सिंग यांच्यासोबत दुचाकीवरून साकीनाका येथून सिप्झच्या दिशेने जात होती. आदेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकाला जोरात धडक दिली, त्यात निकिता गंभीररीत्या जखमी झाली होती, त्यातच तिचा मृत्यू झाला. आदेशची मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले होते. अपघाताला आदेश हाच जबाबदार असल्याने त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.