
जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१२ अंकांनी वधारला. धातू व बांधकाम क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी झाली.
सेन्सेक्स २१२.८८ अंकांनी वधारून ५९,७५६.८४ वर बंद झाला तर दिवसभरात तो ४१५.९८ वधारून ५९९५९.९४ वर गेला होता. तर निफ्टी ८०.६० अंकांनी वधारून तो १७७३६.९५ वर बंद झाला.
टाटा स्टील, पॉवरग्रीड, सन फार्मा, भारती एअरटेल, टायटन, ॲॅक्सीस बँक, डॉ. रेड्डीज लॅब, एनटीपीसी आदींचे समभाग वधारले. तर बजाज फायनान्स, एशियन पेंटस्, टेक महिंद्रा, नेस्ले आदींचे समभाग घसरले.
आशियातील सेऊल, हँगकँगचे बाजार वधारले तर टोकियो व शांघायचा बाजार घसरला. युरोपात बाजाराची कामगिरी संमिश्र होती.
रिलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले की, बांधकाम, धातू, तेल व गॅस आदी कंपन्यांच्या समभागांचा चांगली मागणी होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे दर पिंपामागे ०.१३ टक्क्याने वधारून ९५.७९ डॉलर्सवर बंद झाले. मंगळवारी परकीय वित्तसंस्थांनी २४७.०१ कोटींचे समभाग विकले. तसेच रुपया ३४ पैशांनी वधारून ८२.४७ रुपयांवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचे मिडकॅप सेन्सेक्स ११०.८५ अंकांनी वधारून २५१५१.७१ वर पोहोचला. तर स्मॉलकॅप सेन्सेक्स ११८.१८ अंकांनी वधारून २८८६६.१२ वर बंद झाला. एनएसईचा सेक्टोरेल निर्देशांक २.९६ टक्क्याने वधारला. तर धातू निर्देशांक २.७१ टक्क्याने वधारला. बँक व एफएमसीजी अर्ध्या टक्क्याने तर ऑटो निर्देशांक ०.२१ टक्के वधारला तसेच आयटी निर्देशांकात ०.५ टक्क्याने घसरला.
भारताच्या विकास दराच्या वाढीमुळे गुंतवणूकदार खूश आहेत. त्यामुळे बाह्य धोक्यांपासून दुर्लक्ष करून बाजार उसळत आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे समभाग संशोधन प्रमुख श्रीकांत चौहान यांनी सांगितले.