कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ऐन दिवाळीतच खंडित; BMC प्रशासनाचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कुपर या रुग्णालयांत तसेच उपनगरीय रुग्णालयांत ५-६ वर्षांपासून, तसेच कोविड काळात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कुपर या रुग्णालयांत तसेच उपनगरीय रुग्णालयांत ५-६ वर्षांपासून, तसेच कोविड काळात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोविड काळात जोखीम पत्करून, रुग्णालयीन सेवा देणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ऐन दिवाळीतच खंडित केल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे 'म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने'चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर म्हणाले.

पालिकेच्या सर्वच रूग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, क्ष किरण सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस सहाय्यक यांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या सापेक्ष पालिकेने कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून घेतले होते. या कंत्राटी नियुक्तींचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात येत होते.

'रिक्त पदभरती होईपर्यंत कंत्राटी पद्धत चालू राहावी'

जानेवारी २०२५ पर्यंत नूतनीकरण मिळालेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर नंतर कामावर येऊ नका, असे संबंधित रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. असे झाले तर इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडणार असून, अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णालयीन सेवा कोलमडू शकते. त्यामुळे रिक्त पदभरती होईपर्यंत या पदांवर कंत्राटी पद्धत चालू राहावी, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी 'म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने' चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे - बापेरकर यांनी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in