मुंबई : मुंबई हे शहर अनेक गोष्टींसाठी जगप्रसिद्ध. जगभरातील अनेक पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात. सर्वांचे प्रथम आराध्य असलेल्या गणपतीचे श्री सिद्धिविनायक मंदिर जगविख्यात आहे. दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात रेलचेल असते.
त्यानिमित्ताने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत-खुळे यांच्याशी केलेली 'नवशक्ति'ने केलेली विशेष महाराष्ट्र बातचीत. गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते?
गणपती बाप्पाचे नाव घेतल्यावर कोणतीही संकटे, दुख उरत नाहीत. काम आपोआप निर्विघ्नपणे पार पडते. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारीपदी काम करीत एवढ्या मोठ्या स्वरूपात भक्तांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटतो. एखाद्याला गणेशभक्तांची सेवा करण्याची, वैद्यकीय मदत करण्याची आणि ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याची संधी मिळते. मुंबई सारख्या महानगरातील गणेशोत्सव हा श्रद्धेचा मार्ग ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या बळकट करतो.
श्री सिद्धिविनायक मंदिराबद्दल काय सांगाल?
मी लहानपणापासून श्री सिद्धिविनायकाच्या महिमांची साक्षीदार आहे. माझ्या स्वतःच्या सिद्धिविनायकावरील भक्तीचा खूप चांगला अनुभव आहे. जो कोणी शुद्ध हेतूने या मंदिरात दर्शनासाठी येतो, त्याच्या मनोकामना नेहमी पूर्ण होतात, यात शंका नाही. या मंदिरात गेल्यावर निराश होऊ शकत नाही. बाप्पा हा आपल्या सर्वांचा तारणहार आहे, तो सारे काही ठीक करेल, असे आपल्याला वाटते. दर मंगळवारी, संकष्टी आणि अंगारकी या दिवशी अडीच, तीन लाख ते सात ते आठ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाची व्यवस्था चोख असावी आणि सर्वांना योग्य प्रसाद मिळावा ही माझी जबाबदारी आहे आणि यात मला भाविकांचे तसेच पोलिसांचे विशेष सहकार्य लाभते.
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या लोकोपयोगी कार्याबद्दल सांगा?
ट्रस्टतर्फे डायलिसिसची व्यवस्था करण्यात आली असून, अकरावीपासून बी. कॉम, बीएस्सी आणि बीएपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. तसेच ट्रस्टकडून प्रत्येक रुग्णाला २५ हजार दिले जातात. शहीद आणि शेतकऱ्यांच्या मुलांनाही मंदिर ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती दिली जात आहे.
तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकारी आणि मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना लोकांच्या कायम लक्षात राहील अशी एखादी कोणती गोष्ट तुम्हाला करावी वाटते?
तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, देशभरातील रुग्ण कॅन्सरग्रस्त रुग्ण टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात, त्यांना बऱ्याचदा जागा अपुरी पडते, खर्च परवडत नाही, अशा रूग्णांना रस्त्यावर राहताना पाहून मला वेदना होतात. रस्त्यावर राहणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी त्याठिकाणी श्री सिद्धिविनायकाचे भक्त निवास बांधले जावे तसेच कर्करुग्णांसाठी निवासाची सोय करण्याचे माझे स्वप्न आहे.
सनातन संस्कृतीत मंदिराचे योगदान?
मंदिर हा धर्माचा एक प्रमुख भाग आहे. जिथून धार्मिक शिक्षण दिले जाते. मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आजही समाजात मंदिरात जाण्याची परंपरा कायम टिकून राहिली आहे. सनातन संस्कृतीत मंदिरात सनातन संस्कृतीचा उदय होत आला आहे आणि पुढेही होत राहील, अशी लोकांची अढळ श्रद्धा आहे. धार्मिक श्रद्धेमुळेच लाखोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात, धर्म आणि मंदिर यांच्यातील समन्वय अथांग आहे, हे शब्दात सांगता येणार नाही.
तुम्ही जनता आणि मंदिर यांच्यात समन्वय साधता का?
केवळ मुंबई महानगरातील लोकच नाही, तर संपूर्ण देश गणेशोत्सव मनापासून साजरा करतो. आमच्यासाठी भक्तांची सेवा करणे हे पवित्र काम आहे. आम्हाला विशेषतः जनतेची सेवा करायची आहे. लोक आणि मंदिर यांच्यातील विश्वासाचे अतूट नाते जपायचे आहे. मुंबई महानगरातील सर्व गणेश भक्तांना मी शुभेच्छा देते आणि त्यांना निस्वार्थीपणे काम करण्याचे आवाहन करते. बाप्पा सर्वांचे रक्षण करो, सर्वांना सुखी ठेवो आणि सर्व अडथळे दूर करो.