मंबई : चुनाभट्टी गोळीबारप्रकरणी अन्य सात आरोपींना चुनाभट्टी पोलिसांनी विविध परिसरातून अटक केली. त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तेरा झाली आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने सोमवार, ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चुन्नाभट्टी येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील आझाद गल्लीत रविवारी, २४ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात सुमीत ऊर्फ पप्पू येरुणकर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता, तर त्याचे तीन सहकारी रोशन निखील लोखंडे, आकाश खंडागळे, मदन पाटील आणि आठ वर्षांची मुलगी असे चारजण जखमी झाले होते. या गोळीबाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकऱ्यांच्या अटकेसाठी नऊ टीमची नियुक्ती केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच सागर संजय सावंत, सनील ऊर्फ सनी बाळाराम पाटील, नरेंद्र ऊर्फ नऱ्या गजानन पाटील, आशुतोष ऊर्फ बाबू, देवीदास या चोघांना २५ डिसेंबरला तर प्रभाकर निवास पाचिंद्रे ऊर्फ पच्या व सानिध्य संभाजी देसाई या दोघांना २६ डिसेंबरला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर इतर काही आरोपीचे नाव समोर आले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच प्रज्योत अमित माने ऊर्फ नन्या, प्रशांत प्रल्हाट रोटकर, नचिकेत हिरामण गावंड या तिघांना १ जानेवारीला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. याच दरम्यान पोलिसांना इतर काही आरोपींचा सहभागाचे पुरावे सापडले होते. त्यानंतर या पथकाने विघ्नेश रमेश कांबळे, अभिषेक चाळके, रणजीत गंगाप्रसाद यादव आणि आणि विमल मोहनलाल जैन या चौघांना अटक केली. अटकेनंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.