एसटी महामंडळात दाखल होणार चार वर्षांत सात हजार गाड्या

कर्मचाऱ्यांच्या ६ महिन्याच्या संपामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एसटी महामंडळात दाखल होणार चार वर्षांत सात हजार गाड्या

एसटी महामंडळाकडून एसटीचा प्रवासदर्जा वाढविण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘एसटी पुनरुज्जीवन आराखड्या’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील गाड्यांवर भर आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवण्यासाठी विद्युत, सीएनजी गाड्यांचा यात समावेश आहे. चार वर्षांत टप्याटप्याने सात हजार गाड्या घेत महसूल वाढवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना काळापासून एसटीचा महसूल घटला आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या ६ महिन्याच्या संपामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्षभरात महामंडळाचा संचित तोटा १०,४०७ कोटी रुपये इतका आहे. हा तोटा कमी करण्यासाठी ‘एसटी’ने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. पाच वर्षे शून्य नोकरभरती, दरवर्षी भाडे आढावा, उत्पन्नवाढीसाठी प्रवासी वाहतुकीशिवाय अन्य पर्यायांवर भर या निर्णयांचा आराखड्यात समावेश असणार आहे. एसटी धावली तरच उत्पन्न मिळेल, या गणितानुसार सर्वात प्रथम ताफा वाढवण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण अभ्यासाअंती महामंडळाकडून भाड्याने गाड्या घेण्यात येतील.

२०२२-२३मध्ये स्वमालकीचा ताफा १५ हजार ३८०, तर भाडेतत्त्वावरील गाड्यांची संख्या ९५० इतकी आहे. सन २०२६-२७ मध्ये स्वमालकीच्या १२ हजार ८८० आणि सात हजार गाड्या भाड्याच्या असतील. यामुळे हा ताफा २२ हजार १८० होईल, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in