नोटबंदीला सात वर्षे पूर्ण 'त्या' बेपर्वा निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला - जयराम रमेश

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीचा हा निर्णय पाहता त्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले.
नोटबंदीला सात वर्षे पूर्ण 'त्या' बेपर्वा निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला - जयराम रमेश

नवी दिल्ली : नोटबंदीला सात वर्षे झाली असून त्यानिमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. नोटबंदीचा निर्णय हा बेपर्वाईने घेतला गेला आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. या भीषण आपत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश माफ करणार नाही, असे ताशेरे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका पत्रकाद्वारे ओढले आहेत.

नोटबंदी आणि वाईट प्रकारे अंमलात आणलेले जीएसटी यामुळे लघु व मध्यम उद्योगांमधील नोकऱ्या निर्माण करण्याची ताकद संपुष्टात आणली गेली. ४५ वर्षांमधील बेरोजगारीचा हा उच्च स्तर होता आणि २०१३ मध्ये आर्थिक ताकद पुन्हा देश मिळवू पाहात होता, ती क्षमताही संपुष्टात आणली गेली, असे जयराम रमेश म्हणाले.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीचा हा निर्णय पाहता त्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. हा निर्णय म्हणजे मोदी सरकारच्या अमानुषता, आर्थिक निरक्षरता याचेच उदाहरण आहे. तशात लॉकडाऊन अचानक केल्यानेही फसवणूकच झाली आणि लाखो कामगार बेरोजगार झाल्याने हजारो किलोमीटर चालत आपल्या मूळ गावी परतले. पंतप्रधानांनी लोकांची खिल्ली उडवल्याचे सांगत जयराम रमेश यांनी सांगितले की, ‘घर में शादी है, पैसा नहीं है’ म्हणणारे पंतप्रधान कोण विसरू शकेल? नोटा बदलण्यासाठी लांबच लांब रांगा लावून मरण पावलेल्या शेकडो गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सले विसरता येईल. श्रीमंत लोक त्यांच्या नोटा सहजतेने बदलण्यात यशस्वी झाले.

अर्थव्यवस्था उध्वस्त करण्यासोबतच आणि काही लोकांच्या हातात संपत्ती केंद्रीत करण्यासोबतच, मोदी सरकारच्या हातावर बेपर्वा नोटाबंदीमुळे रक्त लागले आहे. भारत या मोठ्या आपत्तीसाठी पंतप्रधानांना माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in