Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध

अंधेरी (पूर्व) येथील मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालयाचा कारभार सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रा. लि. कडे सोपविण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने मंगळवारी मंजुरी दिली.
Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध
Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध(संग्रहित छायाचित्र - FPJ)
Published on

मुंबई: अंधेरी (पूर्व) येथील मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालयाचा कारभार सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रा. लि. कडे सोपविण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने मंगळवारी मंजुरी दिली. शिवसेना-भाजप सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांचा तीव्र विरोध हाणून पाडत हा प्रस्ताव मंजूर केला.

हा प्रस्ताव यापूर्वी मे महिन्यात सुधार समितीसमोर आला होता. त्यावेळी झालेल्या तीव्र विरोधानंतर प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. मंगळवारी पुन्हा सुधार समितीत तोच प्रस्ताव समितीसमोर सादर करण्यात आला.

ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी खासगी कंपनीला रुग्णालय चालविण्यासाठी देण्याची गरज नाही, असे सांगत प्रस्तावावर आक्षेप घेतला. मात्र सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी प्रशासनाकडून कोणतेही अतिरिक्त स्पष्टीकरण न घेता प्रस्ताव मंजूर केला. मूळ करार शिवसेना (उबाठा) सत्तेत असताना मंजूर झाला होता, त्यामुळे आता विरोध करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अश्रफ आझमी यांनी समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच रुग्णालयात काम सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला.

महापालिकेनेच रुग्णालय चालवण्याची मागणी

सुधार समिती सदस्य सचिन पडवळ यांनी महापालिकेनेच हे रुग्णालय चालवावे, अशी मागणी केली. "खासगी रुग्णालये सर्वसामान्यांसाठी पुरेशा खाटा राखून ठेवत नाहीत. सेव्हन हिल्स हे मुंबईतील महत्त्वाचे रुग्णालय असून ते महापालिकेनेच विकसित करून चालवावे. महापालिकेकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे," असे पडवळ म्हणाले. शिवसेना (उबाठा) च्या नगरसेविका विशाखा राऊत यांनीही या निर्णयाला विरोध करत, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मोठा अर्थसंकल्प आहे. मग खासगी कंपनीची गरज काय? कोविड काळात सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने यशस्वीपणे चालवले होते, असे मत व्यक्त केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)s

logo
marathi.freepressjournal.in