महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

तांत्रिक मुद्द्यामुळे सातवा वेतन आयोग न मिळालेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांनाही आयोग लागू करण्याची विनंती
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंह पारछा यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक मुद्द्यामुळे सातवा वेतन आयोग न मिळालेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांनाही आयोग लागू करण्याची विनंती केली आहे.

राज्य सरकारने १ जानेवारी २०१६ रोजी सातवा वेतन आयोग जाहीर करून, त्याची १ जानेवारी २०१९ रोजी अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तो ठाणे महापालिकेत लागू करण्यात आला नव्हता. या संदर्भात भाजपा व भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून सातत्याने आवाज उठविला जात होता. या संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंह पारछा, भाजपाचे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी, मोर्चाचे उपाध्यक्ष हिरामण सुर्वे, सरचिटणीस संजय गोंदवलेकर, रमेश जाधव यांच्या शिष्टमंडळाने ९ मे रोजी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेउन महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. अन्यथा, आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा दिला होता. या प्रश्नावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त शर्मा यांनी दिले होते. अखेर महिनाभरातच रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.

आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार सातवा वेतन आयोग देण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयाबद्दल आमदार निरंजन डावखरे व व मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंह पारछा यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक मुद्द्यामुळे अद्यापी सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in