
मुंबई : नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन सुरू असून गोरेगाव पूर्व आरे जंगलातून उगम पावणाऱ्या वालभाट नदीचे पुनरूज्जीवन व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणच्या पाहिला टप्प्यातील मलनि:स्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते धीरज वैली गोकुळधाम गोरेगाव पूर्व प्रभाग-५२ येथे पार पडले. या प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचा या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
लहानपणी दहिसर, पोइसर या नद्या राष्ट्रीय उद्यानातून निघताना किती स्वच्छ असायच्या, याचा अनुभव सांगून पुन्हा एकदा वालभाटसारख्या नद्यांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त होणार असल्याचे समाधान व्यक्त केले. त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीनी व नागरिकांनी या सर्व कामावर लक्ष ठेऊन ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
माजी नगरसेविका प्रीती सातम म्हणाल्या की, “नदीला आपले मूळ रूप प्राप्त करून देण्याचा जो प्रकल्प महापालिकेने हाती घेतलेला आहे, त्याच्याअंतर्गत आरेच्या जंगलामधून निघून ओशिवरा खाडीला मिळणाऱ्या वालभाटचे सुशोभीकरण/ पुनरुज्जीवन कामाची सुरुवात होत आहे. त्याअंतर्गत मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प त्याचेही भूमिपूजन होत असून त्यामुळे तबेला, इंडस्ट्रिज व रहिवाशी विभागातून नदी प्रदूषित करणारे सांडपाणी व या प्रदूषणामुळे या नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. त्याचपद्धतीने नदीमध्ये झालेले अतिक्रमण, भराव काढून टाकणे, नदीचे पात्र रुंद करणे त्याच्यासोबत नदीच्या दोन्ही बाजूने रस्त्याची व्यवस्था करणे, झाडे लावून त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क इतकेच नव्हे तर नदीमध्ये फिरण्यासाठी बोटिंगची व्यवस्था अशा अनेक गोष्टी यात समाविष्ट आहेत.”