म्हाडाच्या मलनिस्सारण वाहिन्यांचा अभ्यास होणार ;अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

प्रत्यक्ष काम झाल्यावर सभोवतालच्या परिसरातील मलनिःसारण समस्येचे निराकरण होऊन मलनिःसारण व्यवस्थेचा लाभ मिळेल व नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी होण्यास मदत होईल
म्हाडाच्या मलनिस्सारण वाहिन्यांचा अभ्यास होणार ;अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

मुंबई : म्हाडाच्या अखत्यारितील मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता अपुरी पडत आहे. त्यामुळे म्हाडाच्या मलनिस्सारण वाहिन्यांचा अभ्यास करणे, आराखडा तयार करणे व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाच्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या पायाभूत सुविधांची कामे आता पालिकेकडे सोपवण्यात आली आहेत. दरम्यान, या कामासाठी सल्लागाराला वस्तू व सेवाकर वगळता ७८ लाख ४० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

पश्चिम उपनगरातील म्हाडाच्या अखत्यारितील मलनिःसारण वाहिन्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने तेथील मलनिःसारण वाहिन्या तुंबून मलजल रस्त्यावरून वाहत असतो. मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या/ परावर्तित करण्यात येणाऱ्या मलनिःसारण वाहिन्यांचा अभ्यास, विश्लेषण, योजना, आराखडा, अंदाजपत्रक व त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करून निविदा तयार करण्यासाठी मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे.

आठ महिन्यांमध्ये काम अपेक्षित

प्रत्यक्ष काम झाल्यावर सभोवतालच्या परिसरातील मलनिःसारण समस्येचे निराकरण होऊन मलनिःसारण व्यवस्थेचा लाभ मिळेल व नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी होण्यास मदत होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. पावसाळ्यासहीत आठ महिन्यांमध्ये हे काम अपेक्षित असून, आणि अभिन्यासांतील टप्पा-१ मधील काम करण्याच्या व शेवटच्या कामाचे कार्यादेश कंत्राटदारास दिल्यानंतर तीन वर्षांपर्यंत हा कंत्राट कालावधी वैध राहणार आहे. या प्रस्तावास, अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ६९ (क) अन्वये, प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

नवीन शौचालये बांधणार

म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या शौचालयांच्या जागी नवीन बांधकाम करण्याची जबाबदारी सरकारने पालिकेकडे सोपवली आहे. यापूर्वी शौचालय बांधकामाच्या कामांवर पालिकेच्या संबंधित खात्याची देखभाल असायची.

logo
marathi.freepressjournal.in