Video : मुंबईची शबनम पायी निघाली अयोध्येला, श्री रामाच्या दर्शनाला!

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील पाच लाख मंदिरांमध्ये राम लल्लाच्या स्थापनेसह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
Video : मुंबईची शबनम पायी निघाली अयोध्येला, श्री रामाच्या दर्शनाला!

मुंबई : अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभू रामाचे भव्य राम मंदिर आकारास येत आहे. या भूमीवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात टोकाचा तणाव पाहायला मिळाला. अनेकदा दंगलीही झाल्या. त्यात शेकडो लोक जीवाला मुकले. आजच्या या काळात एकीकडे धार्मिक विद्वेष वाढत असताना एका मुस्लीम तरुणीची प्रभू रामाविषयीची ओढ मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुळची मुंबईची असलेली शबनम शेख अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी पायी निघाली आहे. श्रीरामाचा झेंडा घेऊन तिने आतापर्यंत शंभर किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. सध्या ती नाशिक परिसरात आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीवर आकारास येणाऱ्या भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला एक महिन्याहून कमी कालावधी राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. देशभरातील मोजक्यात मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले. या सगळ्या उत्साहात मुंबईतील शबनम शेख ही तरुणी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येच्या यात्रेला पायी निघाली आहे.

शबनमसोबत तिचे दोन मित्रही आहेत. त्यांची नावे बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा अशी आहेत. त्यांच्या प्रवासाचा मंगळवारी सहावा दिवस होता. नाशिकमधून प्रस्थान करीत ते आता अयोध्येकडे पायी निघाले आहेत. शबनम धर्मनिरपेक्ष विचारांचा पुरस्कार करणारी आहे. शालेय जीवनापासून रामायण ऐकत आले आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल मनात जितका आदरभाव आहे तितकीच उत्सुकता आहे, असे शबनम सांगते. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या वारी सुरू असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. या पदयात्रेदरम्यान रामभक्तांसोबत झालेल्या भेटींचे व्हिडिओ 'जय श्री राम' म्हणत ऑनलाइन प्रसारित केले जात आहेत. शबनम नियमितपणे तिच्या ट्रेकिंग ट्रिप इंस्टाग्रामवर शेअर करत आहे, त्यामुळे तिचे खूप कौतुक होत आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील पाच लाख मंदिरांमध्ये राम लल्लाच्या स्थापनेसह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने राम मंदिराचा वाद सुटला होता. त्यानंतर रामजन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत या मंदिराची पायाभरणी केली होती. साडेतीन वर्षांत हे मंदिर आकारास येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in