राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखले

उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सोमवारी दुपारीच राजीनामा देण्याची तयारी केली होती
राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखले

शिवसेनेने नोटीस बजावलेल्या १६ आमदारांना १२ जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून अभय मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपने अविश्वास ठराव आणल्यास पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सोमवारी दुपारीच राजीनामा देण्याची तयारी केली होती; मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना त्यापासून रोखले, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पूर्वीही बंडाच्या पहिल्या दिवशी २१ जूनलाच उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. त्यानंतर २२ तारखेला राजीनामा देण्याचा त्यांनी ठाम निश्चय केला होता. दोन्ही वेळी पवारांनी त्यांना रोखले,असे या सूत्राने सांगितले. शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे पुरते कोलमडून गेले आहेत. पक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंड होईल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. आमदार नाराज आहेत, याची त्यांना कुणकुण होती. एकनाथ शिंदे यांनी ही बाब उद्धव यांच्या कानावर घातली होती. आमदार असे टोकाचे पाऊल उचलतील, असे वाटले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनाम्याच्या मनस्थितीत आहेत; मात्र शरद पवार त्यांना त्यापासून वारंवार परावृत्त करत आहेत. आमदारांचे बंड शमेल. काही आमदार पुन्हा शिवसेनेत परततील, असे पवार त्यांना सांगत आहेत. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते. त्याच दिवशी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करणार होते; पण पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in