

मुंबई : मनसेला सोबत घेण्याचा निर्णय होताच महाविकास आघाडीत बिघाड झाला आणि काँग्रेस पक्षाने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी मुंबईत आघाडी महत्त्वाची आहे, असे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मनसे व शिवसेनेसोबत जाण्याचा पर्याय निवडला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर उद्धव ठाकरे यांचे १५४ व मनसेचे ६२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. युती व आघाडीत जागावाटपाचा घोळ दिवसभर सुरू होता. त्यातच ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे.
तीन प्रादेशिक पक्ष एकत्र
मुंबई महापालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरी जाईल, असे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ठाकरे बंधू व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन मुंबईत नवीन युती निर्माण झाली आहे. हे तिन्ही प्रादेशिक पक्ष आहेत.