मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने केंद्रीय कृषीमंत्री पदाची ऑफर दिली आहे. त्याचबरोबर नीती आयोगाचे उपाध्यक्षपदही देऊ केल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला आहे.
चव्हाण यांनी ‘एफपीजे-नवशक्ति’ला सांगितले की, पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपस्थित होते.
शरद पवार यांना नीती आयोगाचे उपाध्यक्षपद तसेच केंद्रात कृषी मंत्रीपद देण्याची ऑफर भाजपने दिली. मात्र, माझ्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दिलेली ऑफर शरद पवार यांनी स्वीकारलेली नाही. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह अजित पवार आपल्या काकांपासून दूर गेले, तेव्हापासून ते एका ज्येष्ठ मराठा नेत्याशी संवाद साधत आहेत.
चव्हाण म्हणाले की, ‘‘जयंत पाटील, पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही सरकारमध्ये सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजित पवार यांनी नुकतीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांची समजूत काढण्याचे काम अजित पवारांवर सोपवले आहे.
आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात अधिक जागा मिळवण्यासाठी शरद पवारांनाही आपल्यात सामावून घेण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रांनी सांगितले की, शरद पवार हे भाजपच्या दबावाला बळी पडू शकतात, कारण त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना फारसे राजकीय भवितव्य दिसत नाही. शरद पवार यांच्या बहुतांश आमदारांनी त्यांना सोडून दिले आहे आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांच्या राजकीय सभांना अपेक्षित प्रतिसादही मिळत नाही.
दरम्यान, ‘इंडिया’ या विरोधकांच्या आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे. कारण अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटीमुळे संभ्रम निर्माण होत आहे. या बैठकांच्या स्वरूपाबाबत शरद पवारांना अजिबात भान नाही, असे विरोधी पक्षातील अनेकांना वाटते.
‘‘ते अत्यंत गुप्तपणे खेळी खेळत आहेत. त्यांनी अखेरीस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत युती केल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. भाजपच्या दबावापुढे ते फारच असुरक्षित समजत आहेत,” असे चव्हाण यांनी सांगितले.
शरद पवार व अजित पवार यांच्या सतत बैठका होत असल्याने शिवसेनेतही नाराजीचे वातावरण आहे. काका-पुतण्याच्या भेटींना मान्यता दिली का, असे विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या बैठकांच्या योग्यतेचा निर्णय शरद पवारांनाच घ्यायचा आहे.’’
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांच्या बैठकीत काहीच वावगे नाही. कारण नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटले होते.’’ मात्र, पवार यांच्या खेळीने उद्धव ठाकरे हे चिंतेत पडले आहेत. कारण त्यांच्या या खेळीने महाविकास आघाडी अडचणीत सापडू शकते. ऑगस्टच्या अखेरीस मुंबईत ‘इंडिया’ या विरोधकांच्या आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीच्या व्यवस्थेचे काम शिवसेनेकडे आहे. कलिनाच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या या परिषदेला शरद पवार हे उपस्थित राहणार का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे.