मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ शिबिराला शरद पवार राहणार उपस्थित

येत्या २९ मार्च रोजी मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सभेला पक्षाध्यक्ष शरद पवार संबोधित करणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली
मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ शिबिराला शरद पवार राहणार उपस्थित

निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजप नेहमीच ॲक्शन मोडवर असतो. आता त्यांच्या साथीला शिवसेना देखील आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नुकतीच पार पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही सभा होत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागली आहे. येत्या २९ मार्च रोजी मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सभेला पक्षाध्यक्ष शरद पवार संबोधित करणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

२९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता चेंबूर येथे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आगामी मुंबई मनपा निवडणुकीबाबत शरद पवार मार्गदर्शन करतील असे महेश तपासे यांनी सांगितले. त्याचसोबत २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा छत्रपती संभाजीनगर येथे होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व सभेला राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती असेल, असेही ते म्हणाले.

शनिवारी विधिमंडळाचे कामकाज संपले आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसाच्या उत्तर महाराष्ट्राच्या तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे मराठवाडा दौर्‍यावर जनतेच्या दारात समस्या ऐकून घेण्यासाठी दाखल झाले आहेत असेही महेश तपासे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या खासदारकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी होणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींचा कायद्याचा आधार घेऊन रद्द केली आहे. मात्र राज्यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग कोर्टाने दोन वर्षाची सजा सुनावली असताना याच कायद्याचा आधार घेऊन त्यांची आमदारकी का रद्द करण्यात येत नाही असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in