
मुंबई : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपविरोधी इंडिया आघाडीतील जागावाटपाचा विषय कमालीचा संघर्षाचा ठरत आहे. याला जोडूनच राज्यातील पक्षसंघटना आणि दिग्गज नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याच सल्ल्याने ठरविण्याचे धोरण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांनी ठरविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात त्या दोन्ही नेत्यांची पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत लोकसभा निवडणुकीची इंडिया आघाडी आणि काँग्रेसची मांडणी व नियोजन अचूक विजयाकडे नेणारे असावे, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटते. गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात विविध संस्थांनी केलेल्या मतदार सर्वेक्षणाचे निष्कर्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेले आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २८ जागा भाजपविरोधी आघाडीला, तर केवळ २० जागा भाजप आघाडीला मिळण्याची शक्यता सर्वेक्षणाचे निष्कर्ष दर्शवितात. परंतु, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मोदीलाटेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व पिछेहाट झाल्याने सध्या इंडिया आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संख्या वाढली आहे. त्याच कारणाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना विद्यमान खासदारांची संख्या आणि अतिरिक्त अशा किमान २५ जागांवर हक्क सांगू शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना सर्वसामान्य तोडगा काढणे, हे खूप मोठे आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांपुढे राहिले आहे.
शरद पवारच कोंडी फोडू शकतात!
इंडिया आघाडीतील जागावाटपाची कोंडी फोडण्याचे काम केवळ शरद पवारच करू शकतात, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बंटी तथा सतेज पाटील, प्रणिती शिंदे, अमित विलासराव देशमुख, विश्वजीत पतंगराव कदम यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार निवडीत अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याची क्षमता फक्त शरद पवारांकडे आहे, असाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा कयास आहे.
अजित पवारांची बलस्थाने
‘निवडून येण्याची क्षमता,’ या प्रमुख निकषाच्या आधारावर उमेदवार ठरविताना पक्षीय जागावाटप हा विषय अडचणीचा ठरणार आहे. त्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आघाडीला लोकसभा निवडणुकीत कुठे कुठे फायद्याची ठरू शकते, याचा अंदाज पवारांना आहे. विशेषत: साखर पट्टा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अजित पवारांची लोकसभा निवडणुकीवर परिणाम करू शकणारी अचूक बलस्थाने पवारांनाच माहीत आहेत, असे मानले जाते.
प्रकाश आंबेडकर आणि मतविभाजन
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेबरोबरच प्रकाश आंबेडकर व एमआयएमच्या वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा खूप मोठा फटका बसला होता. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. प्रकाश आंबेडकर सध्या इंडिया आघाडीत नसले तरी ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. हाच धागा पकडून शरद पवार आंबेडकरांसोबत काही मुद्द्यांवर सशर्त युतीचा पर्याय उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पुढे आणू शकतात. तशाच प्रयत्नांचा भाग म्हणून खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीकडे पाहिले जाते.
नाना पटोलेंचा निष्फळ दिल्ली दौरा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागच्या आठवड्यात दिल्ली दौरा केला. या दौऱ्यातही पक्षश्रेष्ठींनी कुठलेही स्पष्ट निर्देश दिले नव्हते. त्याचे कारणही शरद पवार यांच्या राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दडले असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या गौतम अदानींशी असलेल्या दोस्तान्याबाबत घेतलेली मवाळ भूमिकाही पक्षश्रेष्ठींच्या शरद पवारांबाबतच्या धोरणाला पुष्टी देते.