पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांचाही सहभाग; अतुल भातखळकरांचा गंभीर आरोप

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती
 पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांचाही सहभाग; अतुल भातखळकरांचा गंभीर आरोप

एक हजार ३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा दावा करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रात ‘ईडी’ने पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन कालबद्ध मर्यादेत या संबंधांची चौकशी करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी.

पत्राचाळ प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी म्हाडा हे प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्यशक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत, महाराष्ट्राचे जाणते राजे म्हटल्या जाणाऱ्या नेत्यापर्यंत जात आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. अतुल भातखळकर यांनी आपल्या आरोपांसंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्रावरून म्हाडावर बाह्यशक्तीचा दबाव होता, हे स्पष्ट होत असल्याचे भातखळकर म्हणाले. तसेच, मराठी माणसाला न्याय देण्याकरिता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरिता या संदर्भात एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.

गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यातून शेकडो मुंबईकरांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार होती; मात्र गुरू आशिष कंपनीच्या प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर बिल्डरांना विकल्याचे समोर आले आहे. यातून जवळपास एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.

...तर गृहमंत्री चौकशी करतील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांचा हस्तक्षेप आहे, असे पत्र लिहून म्हटले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील म्हणूनच गृहमंत्र्यांकडे ही विनंती केली आहे. गृहमंत्री आणि सरकार त्याची चौकशी करतील, असे मला वाटते.’’

शरद पवारांचे नाव नाही : राष्ट्रवादीचा दावा

“पत्राचाळ प्रकरणाची जी काही चौकशी सुरू आहे, त्यात ‘ईडी’ने शरद पवार यांचे नाव कुठेही घेतले नाही. खोटे बोल; पण रेटून बोल ही भाजपची पद्धत आहे. महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in