मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने ‘शेअर चार्ज’ सुविधा उपलब्ध केली आहे. लवकरच उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांत साडेआठ हजार चार्जर लावण्यात येतील, अशी अदानी इलेक्ट्रिसिटीकडून देण्यात आली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण नियंत्रणात आणण्यास मदत होते आणि पैशाची बचत होते. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीचा हा उपक्रम आहे. ईव्ही चार्जिंग स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्याने इमारतींमध्ये इलेक्ट्रिक चार्जर लावण्याचे काम अदानीतर्फे सुरू करण्यात आले आहे.
ईव्ही चार्जिंगचा फायदा
या पद्धतीत वेगवेगळ्या चार्जरची किंवा वायरच्या जंजाळाची गरज नसते. ‘एआरएआय’ने प्रमाणित केलेले शेअर चार्जर स्टेशन इमारतींच्या आवारात उभारले जाईल. त्यामुळे वाहनांना चार्जिंगसाठी जागाही जास्त मिळेल आणि वेगवेगळे चार्जर स्वत: लावत बसण्याचा त्रास कमी होईल.
वाहने चार्जिंगला कधी आणावीत, कोणी किती वेळ चार्जिंग केले व त्याचे बिल किती झाले ते ठरवून त्याचे पैसे देणे ही व्यवस्थादेखील ॲपमार्फत केली जाईल.
हे चार्जिंग अत्यंत स्वस्त दरात होणार असल्यामुळे वाहनचालकांचे पैसेही वाचतील. तसेच यामुळे या सोयीसाठी प्रयत्न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा त्रासही वाचेल. तसेच ही व्यवस्था पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणही होणार नाही.
शेअर चार्जिंग अत्यंत सोयीस्कर, स्वस्त तसेच आगळेवेगळे आहे. यामुळे ही सुविधा उभारण्याचा सोसायट्यांचा त्रास वाचेल, साध्या वाहनांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्याचा सोसायट्यांचा प्रवास आम्ही सोपा करू. शेअर चार्ज हे त्याचेच उदाहरण असून त्याने कमी त्रासात व कमी खर्चात ही सुविधा मिळेल.
वेगवान चार्जिंगद्वारे सामान्य चारचाकींसाठी पूर्ण चार्जिंग करण्यास साधारण सात तास लागतात, तर दुचाकींसाठी साधारण चार तास लागतात. एका चार्जरवर अनेक गाड्यांचे चार्जिंग होऊ शकते. ही व्यवस्था मुंबईत सर्वात स्वस्त दरात मिळेल.