ती’ १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत जाणार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

ती’ १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत जाणार
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
Published on

ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे निगु, मोकाशी, पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे, दहिसर मोरी या गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजित विकास करणे आता शक्य होणार आहे.

१४ गावांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होता. याबाबत अनेकदा सदनात प्रश्न उपस्थित केले गेले; मात्र प्रत्येक वेळी शासन सकारात्मक असल्याचे सांगून पुढे काहीच ठोस घडत नव्हते. चालू अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला होता.

काय आहे या गावांचा विषय?

ठाणे महानगरपालिकेलगत असलेली १४ गावे ही आधी नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र, त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करून त्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ही गावे पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करायला नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे नगरविकासमंत्र्यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत निवडणुकांची प्रभागरचना निश्चित झाली असून, येत्या काही दिवसांत ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोट

१४ गावातील भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. या गावांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधीची तरतूद केली जाईल. १४ गावांसंदर्भात सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांना नवी मुंबईत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नवी मुंबई आयुक्तांना दिले आहेत.

- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

logo
marathi.freepressjournal.in