

मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात मालवणीत वास्तव्याला असलेले हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सध्या तिकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु आहे. प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात ९ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमणमुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे.
लोढा म्हणाले की, एकीकडे मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून ते मुंबईच्या सुरक्षेशी खेळत आहेत. स्थानिक आमदार समाज विघातक शक्तीला अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत.