
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता कामात येणाऱ्या उच्च दाबाच्या केबलचे स्थानांतरण केले जाणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका सुमारे १२ कोटींचा खर्च करणार आहे.
रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची २२ के.व्ही. क्षमतेची ओव्हरहेड हायटेन्शन वायर भूमिगत करून स्थानांतरित करणे तसेच वीजखांब, या खांबांच्या पेटिका, फिडर्स यांचे स्थानांतरण ही कामे केली जाणार आहेत.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजचे (आरओबी) रुंदीकरण समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात विकास आराखड्यानुसार सध्याच्या ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. टप्पा तीन (अ) मध्ये उड्डाणपूल, उन्नत बांधकाम समाविष्ट आहे. ही कामे प्रगतिपथावर आहेत.
टप्पा तीन (ब) या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालील जुन्या बोगद्यासह फिल्मसिटी, गोरेगाव येथे बॉक्स बोगद्याचा देखील समावेश आहे. याची प्राथमिक कामे नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली आहेत. चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल प्लाझापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहन अंडरपास (व्हीयूपी) या कामांचा समावेश आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली जाणार आहेत. या रोडमुळे अनेक प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.
ओव्हरहेड हायटेन्शन वायर भूमिगत करणार
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांची २२ के. व्ही. क्षमतेची ओव्हरहेड हायटेन्शन वायर भूमिगत करून स्थानांतरित करणे तसेच वीजखांब, पेटिका, फिडर्स यांचे स्थानांतरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या एलबीएस रोड, सोनापूर चौकरस्ता ते तानसा पाइपलाइन केबल स्थानांतरित केली जाणार आहे. या कामाचा कालावधी कार्यादेश दिल्यापासून सहा महिने इतका आहे.