
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील मनपा, खासगी व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केल्याचे पत्र सर्व शाळांना पाठवले आहे. शिक्षक भारती संघटनेने याचा तीव्र निषेध करून रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर करावी, असे शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.
मराठी माणसाची अस्मिता असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचे आधिकारी राजेश कंकाळ यांनी ४ ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रानुसार सुट्ट्यांची संख्या जास्त होते, हे कारण देऊन दरवर्षी दिली जाणारी रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केली आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलावून शिक्षण विभाग मराठी सणांना विरोध करत आहे का? असा सवाल मोरे यांनी विचारला आहे.