शिल्पा केळुसकरांच्या उमेदवारीबाबत सुनावणीस हायकोर्टाचा नकार

भाजपच्या बंडखोर पण नंतर अधिकृत ठरलेल्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या निवडणूकविषयक याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
शिल्पा केळुसकरांच्या उमेदवारीबाबत सुनावणीस हायकोर्टाचा नकार
शिल्पा केळुसकरांच्या उमेदवारीबाबत सुनावणीस हायकोर्टाचा नकार
Published on

मुंबई : भाजपच्या बंडखोर पण नंतर अधिकृत ठरलेल्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या निवडणूकविषयक याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये महायुतीची जागा शिंदे गटाला सुटली आहे. तेथून शिवसेना शिंदे गटाने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच पूजा यांचे पती रामदास कांबळे यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे.

“आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकत नाही” असे नमूद करत हायकोर्टाने निवडणुकीसंदर्भातील जवळपास १० याचिका ऐकून घेण्यास नकार दिला. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी कलर झेरॉक्स केलेला एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत सादर केला होता. निवडणूक आयोगाने सुरुवातीला हा अर्ज ग्राह्य धरल्याने भाजपची मोठी अडचण झाली होती. मात्र, शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारल्यानंतरही केळुसकर यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला. हा एबी फॉर्म बनावट असल्याचा दावा करत भाजपने उमेदवारावर कारवाईची मागणी केली होती व पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज नियमानुसार वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट एबी फॉर्म दाखल केल्याप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करून निर्णय द्यावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नियमानुसार उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत आपला अर्ज मागे घेतला नव्हता. तसेच त्याच्याकडे असलेला एबी फॉर्मही खरा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शिल्पा केळुसकर या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in