मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत 'लुकआऊट' नोटीस जारी केल्याने या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्यापारी दीपक कोठारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शिल्पा आणि राज यांनी जवळपास ६० कोटी रुपये हडपले असल्याचा आरोप आहे.
दीपक कोठारी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा आणि राज यांनी 'बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.' या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले. सुरुवातीला हे पैसे कर्ज म्हणून मागण्यात आले, पण नंतर टॅक्स वाचवण्याच्या कारणावरून त्याला इन्व्हेस्टमेंट दाखवण्यात आले.
प्रकरण काय ?
कोठारी यांचे म्हणणे आहे की, त्यांना १२ टक्के वार्षिक व्याजासह ठरलेल्या वेळेत पैसे परत केले जातील, असा विश्वास देण्यात आला होता. एवढेच नाही, तर एप्रिल २०१६मध्ये शिल्पा शेट्टीने वैयक्तिक हमीपत्रही दिले होते. मात्र, काही महिन्यांतच शिल्पाने कंपनीच्या डायरेक्टरपदाचा राजीनामा दिला आणि नंतर कळले की कंपनीवर तब्बल १.२८ कोटी रुपयांचे दिवाळखोरी प्रकरण सुरू आहे. कोठारी यांचा आरोप आहे की, याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. उलट कंपनीच्या नावाने घेतलेले पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेले.