
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने एसटी महामंडळाचा प्रवास ५० टक्के सवलतीने केल्याची घोषणा केली. राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा चांगला फायदा होत असून लाखो महिला ५० टक्के सवलतीने एसटी बसेसने प्रवास करत आहेत. त्यानंतर आता १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारने मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रोचा प्रवास हा आणखी सुखकर आणि सवलतीच्या दरात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की, "मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल." नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला, तर महिलांनासुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवासी सवलत दिली. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे." असा विश्वास त्यांनी दर्शवला.