अजित पवार गटासोबत वादाची ठिणगी पडणार?शिरूरसाठी शिंदे गटही सरसावला

अजित पवार गटासोबत वादाची ठिणगी पडणार?शिरूरसाठी शिंदे गटही सरसावला

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसंकल्प यात्रेचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघातून होणार आहे.

राजा माने /मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर महायुतीत अगोदरच शरद पवार गटाने दावा ठोकला आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, डॉ. अमोल कोल्हे या मतदारसंघातील खासदार आहेत. ते शरद पवार गटात असले, तरी या मतदारसंघातील सर्वाधिक आमदार अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा ठोकला आहे. एवढेच नव्हे, तर खा. कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धारही बोलून दाखविला आहे. हे सुरू असतानाच या मतदारसंघावर शिंदे गटानेही दावा ठोकला आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प यात्रा सुरू करण्याचे निश्चित केले असून, ६ जानेवारी रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघातून या अभियानाची सुरुवात होणार आहे. या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत या मतदारसंघावर शिंदे गट दावा ठोकणार आहे. यावरून आता महायुतीतील प्रमुख पक्ष असलेले मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसंकल्प यात्रेचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघातून होणार आहे. या संदर्भात खुद्द शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री ६ जानेवारी रोजी शिरूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी शिंदे गट शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे याच मतदारसंघावर आधीच अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. महायुतीत या मतदारसंघातील सर्वाधिक आमदार अजित पवार गटाचे आहेत. याच आधारावर अजित पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. एवढेच नव्हे, तर खा. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा विडाही त्यांनी उचलला आहे. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ सहजासहजी सोडेल, याची शाश्वती नाही. कारण येथे त्यांच्या गटाचा तगडा उमेदवार मैदानात उतरू शकतो. त्याला पाठिंबा देण्याची विनंती अजित पवार गटाला केली जाऊ शकते. दरम्यान अजित पवार यांनी शिरूरचा दावा जाहीर सभेतून केला आहे. याबाबत अद्याप महायुतीत चर्चा झाली नसल्याचे समजते. मात्र, या जागेवर महायुतीतील दोन्ही पक्षांनी दावा केल्यास यावरून महायुतीत संघर्ष पेटू शकतो.

निवडणूक लढणारच : शिवाजीराव आढळराव

आगामी लोकसभा निवडणुकीत मीच मैदानात उतरणार असून, आपण शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरमधून आम्हीच उमेदवार देणार, असे म्हटले होते. त्यावर त्यांनी उमेदवारी कोणाला द्यायची, हे ठरवतील. मात्र, मी शिंदे गटातच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील काय भूमिका घेतात आणि ते कोणाकडून लढतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यांनी यापूर्वी अजित पवार गटासोबत जाण्याची तयारी असल्याचे संकेत दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in