शिंदे गटाला बीकेसीवर दसरा मेळाव्याला मिळाली परवानगी; उद्धव ठाकरेंचा अर्ज फेटाळला

दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात कुरघोडीचे राजकारण अनेक दिवस सुरू आहे.
शिंदे गटाला बीकेसीवर दसरा मेळाव्याला मिळाली परवानगी; उद्धव ठाकरेंचा अर्ज फेटाळला
Published on

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्यावरून शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार रस्‍सीखेच सुरू आहे. या रस्सीखेचमधील पहिल्या डावात शिंदे गटाने बाजी मारली आहे, तर शिवतीर्थावरील परवानगी अद्याप न मिळाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाची पुरती कोंडी झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मैदानावर शिवसेनेने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्‍यामुळे आता शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होऊ शकतो, हे स्‍पष्‍ट झाले आहे. पहिला अर्ज केल्‍याने शिंदे गटाला मंजुरी देण्यात आली आहे. असे असेल तर शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी शिवसेनेचा अर्ज पहिला आहे. याच न्यायाने शिवसेनेला शिवतीर्थावर परवानगी मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात कुरघोडीचे राजकारण अनेक दिवस सुरू आहे. शिवतीर्थावर नेमकी कोणाला परवानगी मिळणार, हा प्रश्न आहे. शिवतीर्थ तसेच प्लॅन बी म्‍हणून बीकेसी मैदान इथे परवानगीसाठी दोन्ही गटांनी अर्ज केले होते. बीकेसीसाठी ठाकरे गटाकडून भारतीय कामगार सेनेने अर्ज केला होता. तर शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले यांनी अर्ज केला होता. शिंदे गटाचा अर्ज पहिला असल्‍याने बीकेसीची परवानगी शिंदे गटाला मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे आता शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानात होणार, हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. आता उद्धव ठाकरेंसमोर शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय शिल्लक आहे; पण काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास या मैदानाची परवानगी मिळते की नाही, अशी भीतीदेखील आहे. शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्‍यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा कुठे घेणार, हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. कोणत्‍याही परिस्‍स्थितीत दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, हे उद्धव ठाकरे यांनी म्‍हटले आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हे ठामपणे म्‍हटले आहे. जर शिंदे गटाचा अर्ज पहिला आला म्‍हणून त्‍यांना बीकेसी मैदानात परवानगी मिळाली असेल, तर त्‍याच न्यायाने शिवतीर्थावरील सभेसाठी शिवसेनेचा अर्ज पहिला आहे. शिवसेनेला त्‍याची परवानगी मिळाली पाहिजे. सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यात आला पाहिजे, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. ती कायम राहिली पाहिजे, असेही सावंत म्‍हणाले.

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यांनी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कात पार पडला होता. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव यांनी ही परंपरा सुरू ठेवली. आता बंडखोरीनंतर स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर शिंदे गटाच्या पहिल्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in