
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीतील खेडमध्ये असलेल्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. ५ मार्चला याच मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिदें उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला कसे उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, "खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल," असे म्हणत निशाणा साधला.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, "कोकणच्या जनतेवर काँग्रेस, राष्ट्रवादी अन्याय करणार असेल आणि तुम्ही त्याकडे डोळेझाक करणार असाल, तर मग आम्हाला जनतेबरोबर उभे रहावेच लागेल. खोके खोके कोणाला म्हणता? खोक्याबरोबर खेळण्याची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल, आम्हाला खोक्याबरोबर खेळण्याची सवय नाही." असे म्हणत त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, "आम्ही जनतेसोबत राहिलो. त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला, म्हणून आमदार झालो. दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटून झाल्यावर महाराष्ट्रात येऊन 'मी हे दुरुस्त करेन,' असे आश्वासन देऊन तुम्ही इथे आलात. पण, इथे आल्यानंतर तुम्ही तो शब्द मोडलेला असेल, तर कोणी कोणाला फसवले हे महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा कळले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना फसवलेले आहे. तुम्हाला फसवले मग त्याचा दोष दुसऱ्यांवर का टाकता?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.