

भाईंदर : भाजपचे मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी नवघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत समाजमाध्यमांवरील पोस्टच्या आधारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक होत नगरसेवक, पदाधिकारी आदींनी नवघर पोलीस ठाण्यात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन करत नरेंद्र मेहता यांना तडीपार करण्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत लेखी तक्रारही देण्यात आली असून मंत्री सरनाईक यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा अर्धनग्न अवस्थेतील वादग्रस्त व्हिडीओ व सोशल मीडियावरील शिवीगाळीच्या पोस्टवरून शुक्रवारी मेहतांसह नगरसेवक व पदाधिकारी सुमारे चार तास नवघर पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन बसले होते. यावेळी मेहता यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्यावर अदखलपात्र, तर दुसऱ्यावर दखलपात्र गुन्हा करून चौकशीचे दाखल आश्वासन दिले.
या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाला. शनिवारी शिवसेनेच्या नगरसेविका, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नवघर पोलीस ठाण्यात जमून ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी प्रकरणांवरून नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच मेहतांविरुद्ध २५-२६ गुन्हे दाखल असताना त्यांना अद्याप तडीपार का केले नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांना तडीपार करण्याची मागणी करण्यात आली. सामान्य नागरिकांना त्वरित तडीपार केले जाते, मात्र मेहतांच्या बाबतीत वेगळा निकष का? असा आरोपही करण्यात आला.
योग्य त्या कारवाईचे आश्वासन
मेहता हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात धमकावून शिवीगाळ करतात, तर सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करत असतील याची कल्पना येते. त्यांनी गृहविभाग, शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अविश्वास दाखवून माज दाखवला असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.