४५ जागा जिंकणारच-शिंदे

लोकसभेच्या निकालानंतर भूकंप येणार आणि आमच्या विरोधी पक्षाचे लोक त्याला सहन करू शकणार नाही.
४५ जागा जिंकणारच-शिंदे

प्रतिनिधी/मुंबई : अन्याय अत्याचार करणाऱ्या रावणाच्या अहंकाराचा अंत करण्यासाठी प्रभू श्रीरामाने सेतू बनविला होता. या सागरी सेतूमुळेही अहंकारी लोकांचा अहंकार नष्ट होणार आहे. देशाचे गौरवमुर्ती, विश्वगौरव आणि अतिशय कणखर असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि आशिर्वादाने आम्ही विकासाचे कार्य पुढे नेत आहोत. अबकी बार चारसौ पार चा नारा मजबूत करण्यासाठी आमची जबाबदारी वाढली आहे. फिर एक बार मोदी सरकार हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात यावेळी लोकसभेच्या ४५ जागा जिंकणारच, असा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडला.

आजचा दिवस स्वप्नपुर्तीचा आहे. आज देशातील सर्वात मोठा समुद्री सेतूचा शुभारंभ झाला आहे. या सागरीसेतूचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले होते. त्याचे उदघाटनही त्यांच्याच हस्ते होत आहे याचा अभिमान आहे. कोविड काळातही ज्या अधिकारी-कर्मचा-यांनी काम केले त्यांचे आभारही त्यांनी मानले. हा गेमचेंजर प्रकल्प आहे. इंधन, वेळ वाचणारच पण प्रदूषणही कमी होणार आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचाही शुभारंभ तसेच लेक लाडकी लखपती या योजनेचाही शुभारंभ होत आहे. अटल सेतू हा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आणि मजबूत आहे. देशात जशी मोदी गॅरंटी चालते तसाच हा पूल देखील मजबूत आहे. अटल सेतू हा भूकंप रोधी तंत्रज्ञानाने बनविला आहे; मात्र येत्या लोकसभेच्या निकालानंतर भूकंप येणार आणि आमच्या विरोधी पक्षाचे लोक त्याला सहन करू शकणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in