
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबेना, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पसंती दिली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुप्रिया मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी शिंदे गटाची वाट धरल्याने मुंबईत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना ‘चेकमेट’ दिल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्या अजित पवार गटात मुंबईतील नगरसेवक प्रवेश करतील, असे चित्र होते. मात्र सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावीतील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना एकनाथ शिंदे यांनी भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य शासनाच्या वतीने आपल्या प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास दिला.
दरम्यान, विक्रोळी टागोर नगर विभागाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी ही कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली!
ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सर्वांत आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर समाधान सरवणकर, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे हे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि नंतर मंगेश सातमकर यांनीही शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईत ताकद वाढली आहे.