शिंदेंचे नाव,भाजपचा डाव

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले, तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे रिमोट कंट्रोल असल्याचे दिसून येते.
शिंदेंचे नाव,भाजपचा डाव

मुंबई महापालिकेत २५ वर्षें शिवसेना-भाजप एकत्र नांदत होते. २०१९मध्ये मुख्यमंत्री कोण यावरून वाद झाला आणि भाजप-शिवसेना आता राजकीय शत्रू झाले आहेत. शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आणि आता मुंबई महापालिकेत कमळ फुलवणे, हे भाजपचे लक्ष्य.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले, तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे रिमोट कंट्रोल असल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुंबईकरांवर सुविधांचा वर्षांव केला जातो. डिसेंबर अखेरपर्यंत ५० टक्के मुंबईचे सौंदर्यीकरण अशी घोषणा नुकतीच केली खरी; पण पैसा करदात्या मुंबईकरांचाच. त्यामुळे मुंबईकरांना काय दिले? असा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा शिंदे गटाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतून शिवसेनेला पायउतार करणे आणि मुंबई महापालिकेत कमळ फुलवणे हेच भाजपचे गणित, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख. बंडखोरी ही प्रत्येक पक्षातील नेते सोयीच्या राजकारणासाठी करत असतात. एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली ती शिवसेनेसाठी धक्कादायक आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप नेत्यांनी शिंदे यांची मनधरणी केली आणि त्यात भाजपला यशही मिळाले. शिंदे यांचा करिश्मा ठाण्यात; मात्र मुंबईत शिंदे नावाची ओळख, तशी नसल्याप्रमाणेच. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे वगळता अन्य कुठल्याही नगरसेवकाने उघड उघड पाठिंबा जाहीर केलेला नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाला काही शिवसेना नगरसेवक लागतील, राजकारणात काहीही अशक्य नाही, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच; मात्र ‘शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असा ठसा मतदारराजावर उमटवणे ही भाजपची रणनीती. शिंदे गटाचा तितकासा फायदा भाजपला होणार नाही, हे भाजप नेत्यांनी याचे आकलन केले असणारच. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करणे हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भाजपनेते कामाला लागले.

भविष्यात मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आले, तर मुंबईचे सौंदर्यीकरण ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असे सांगत भाजपचे नेते हात वर करतील, हेदेखील भाजपच्या रणनीतीचा एक भाग असेल. त्यामुळे शिंदे गटाचे नाव घेत सत्ता काबीज करणे भाजपचा डाव, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

गेली २५ वर्षें मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता. शिवसेना नेत्यांनीही मतदारराजाचा वापर फक्त मतदानासाठी करून घेतला. २५ वर्षांच्या सत्तेत ६० टक्के राजकारण अन् ४० टक्के समाजकारण केले. २४ तास पाणी हा शिवसेनेचा वचननामा; मात्र वचननाम्याचे नाममात्र वचन पाळले असे मुंबईत दिसून येत नाही. गेल्या २५ वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होऊ शकले नाहीत. यासाठी इच्छाशक्तीचा अभाव हे मुख्य कारण असू शकते. त्यामुळे शिवसेनेचे गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांच्या समस्यांचे १०० टक्के निवारण केले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. त्यामुळे शिवसेनेने मुंबईचा विकास केला हे निवडणुकीसाठी घोषणा ठीक आहे; मात्र शिवसेनेची खरी ओळख ही स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब अन‌् मुंबई हे अतुट नाते. त्यामुळे आजही शिवसेनेला मानणारा गट आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे ही भाजपची खेळी किती यशस्वी ठरते, हे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in