बंडखोरांविरुद्ध शिवसैनिकांचा उद्रेक ; आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड

कार्यालयाच्या दर्शनी भागावर नामफलक आणि कुडाळकर यांचा फोटो होता त्यावर लोखंडी काठीने घाव घालत शिवसैनिकांनी तो फोटो फोडला
बंडखोरांविरुद्ध शिवसैनिकांचा उद्रेक ; आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड
ANI
Published on

एकेकाळी ‘आक्रमकपणा’ ही शिवसैनिकांची ओळख होती. बाळासाहेबांनी आदेश द्यायची खोटी की जिवावर उदार होऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे आणि शिवसेनेच्या दहशतीने हा हा म्हणता मुंबई ठप्प व्हायची. एकेकाळचा शिवसेनेचा हा दरारा अलीकडे उतरणीस लागलेला दिसून आला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड करूनही मुंबईसह राज्यात त्याचे कोणतेही पडसाद उमटलेले दिसून येत नव्हते. मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांमधील अस्वस्थता वाढली असून आपल्या नेत्याला खिंडीत पकडणाऱ्या शिंदे समर्थकांविरुद्ध शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले. हे कळताच शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा काढला. तसेच मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली. तर नगरमध्ये बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कुडाळकरांच्या कार्यालयावर हल्ला, फोटोची तोडफोड

संतप्त शिवसैनिकांनी शुक्रवारी कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालायावर हल्ला केला. कार्यालयाच्या दर्शनी भागावर नामफलक आणि कुडाळकर यांचा फोटो होता त्यावर लोखंडी काठीने घाव घालत शिवसैनिकांनी तो फोटो फोडला, त्यानंतर नावाचीही तोडफोड केली.

नगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे

अहमदनगरमध्येही शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शहरात असलेल्या एका पोस्टरला काळे फासले. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

नाशिकमध्ये आंबेडकर नगर भागात शिंदे समर्थनार्थ लावण्यात आलेल्या होर्डिंगला शिवसैनिकांनी काळे फासले.

हिंसक घटनेनंतर राज्यात अलर्ट

राज्यातील राजकीय घडामोडींचे शुक्रवारी हिंसक पडसाद उमटत असल्याचे दिसून आल्यानंतर गृह विभाग सतर्क झाला असून राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी शिवसेना भवन, मातोश्री व शिवसेना शाखा तसेच बंडखोर आमदारांचे निवासस्थान व कार्यालयांबाहेर सुरक्षा अधिक कडक केली आहे.

बीडमधील शिंदे समर्थनार्थ लावलेले बॅनर्स उतरवले

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स अखेर उतरविण्यात आले. बीड शहरातील शासकीय विश्रामगृह आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरमुळे कोणताही वाद घडू नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
marathi.freepressjournal.in