शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर, शिवसेना पक्षप्रमुखांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड केले
शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर, शिवसेना पक्षप्रमुखांची घोषणा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने अखेर भाजपप्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे; मात्र आपण हा निर्णय कोणाच्याही दडपणाखाली नाही, तर शिवसैनिकांची इच्छा आणि विनंतीला मान देऊनच घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड केले. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदारांतही दोन गट पडले. रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, असे पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले. त्यानंतर या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदारांतही दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या नेतृत्वासमोर आमदारांनंतर खासदारांना टिकविण्याचेही आव्हान उभे राहिले. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेऊन त्यांची मतेही जाणून घेतली.अखेर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना असल्याचे जाहीर केले.

आपल्या या निर्णयामागे कोणाचाही दबाव नसल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेच्या खासदारांची मते जाणून घेण्यासाठी मी बैठक घेतली. यात सर्वांनी मलाच निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले. यात कोणीही विरोधी सूर आळवला नाही. अनेक शिवसैनिकदेखील आदिवासी समाजाचे आहेत. हे शिवसैनिक तसेच नुकतेच विधान परिषदेवर गेलेले आमश्या पाडवी असतील, निर्मलाताई गावित असतील, यांनीही मला विनंती केली की, आदिवासी समाजातील एक महिला पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी निर्माण झाली आहे. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. याआधीदेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रालोआत असतानाही प्रतिभाताई पाटील असतील वा प्रणव मुखर्जी असतील, यांना पाठिंबा दिला होता. आताचे राजकारण बघता मी खरे तर विरोध करायला पाहिजे होता; मात्र मी शिवसैनिकांची इच्छा आणि विनंती लक्षात घेउन हा निर्णय घेतला.”

logo
marathi.freepressjournal.in