मुंबई : राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मते मागायची असून मिशन-४८ ची सुरुवात करण्यासाठी ‘शिवसंकल्प अभियान’ हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार, मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी व्हीसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. या पक्षपदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले. “प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना पुन्हा सुरुवात होणार असून २५ जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोनदिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील,” असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.
सरकारचे काम घराघरात पोहोचवण्याचा निर्धार
राज्यातील वातावरण सध्या महायुतीला सकारात्मक असून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणारे सरकार अशी आपल्या सरकारची जनमानसात ओळख आहे. त्यामुळे सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याला मते मागायची असल्याचे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. 'शासन आपल्या दारी'च्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ७४ लाख लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आले आहेत. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिलेली आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत १ रुपयात पीक विमा काढून त्यातील अडीच हजार कोटींचे अग्रीम वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून ६ हजार आणि राज्य सरकारकडून ६ असे १२ हजार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे,
श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा दणक्यात साजरा करा
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राममंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. हा क्षण कायम लक्षात राहावा, यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जोगाजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राम मंदिराची उभारणी हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो रामभक्तांचे स्वप्न होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. आपापल्या भागातील मंदिरे, ग्रामदेवतांची मंदिरे येथे विद्युत रोषणाई करून हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असे निर्देश त्यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले.