

मुंबई : दसरा सणानिमित्त मेळावा आयोजित करण्याच्या गेल्या अनेक वर्षांच्या शिवसेनेच्या परंपरेनुसार मंगळवारी होणाऱ्या स्वतंत्र सभांसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या ‘नेस्को सेंटर’मध्ये पार पडणार आहे. एकाचवेळी होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या या मेळाव्यांविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, वादग्रस्त ठरलेली ‘एसआयआर’ प्रक्रिया, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने छेडलेले आंदोलन आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आपल्या आक्रमक भाषणात केंद्र सरकार आणि भाजपचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
तर, नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदे यांच्या पक्षाच्या मेळाव्यात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दरवर्षी सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स ठेवले जातात. राज्यातील दुष्कळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा ते रद्द करण्यात आले आहेत. यावेळी थेट भाषण होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासांत मेळावा संपवला जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मदत पाठवली जाणार आहे. गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती तर यंदा दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य भाषण हेच नेस्कोतील मेळाव्याचे आकर्षण असणार आहे.