
शिंदे गटाने शिवसेना विधिमंडळ पक्षावर आपला दावा केला आहे. आता शिंदे गट शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या धनुष्यबाणावरही दावा सांगण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय आयोगाने घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली आहे.
शिंदे गटाकडे विधानसभेतील दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आधीच आहे. शिंदे गटाने शिवसेना विधिमंडळ पक्षावरही दावा सांगितला आहे. शिंदे गट आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करू शकतो. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यास मोठी नामुष्की येऊ शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आपण विधिज्ञांशी चर्चा केली असून शिवसेनेपासून कोणीही धनुष्यबाण हे चिन्ह हिरावून घेऊ शकत नाही, असेच आपल्याला कायदेशीर सल्ल्यात सांगण्यात आले आहे. आता शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे याबाबत कॅव्हिएट दाखल केले आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्यात आला तर आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देण्यात येऊ नये, अशी विनंती शिवसेनेने आयोगाला या माध्यमातून केली आहे.