शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण टाकलीय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही केली ती गद्दारी नाही, तर हा ‘गदर’ आहे, गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव.
शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण टाकलीय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on

“हजारो शिवसैनिकांनी आपले रक्त सांडून शिवसेना पक्ष उभा केला, तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे, तुम्ही तर पक्षाचा रिमोटच राष्ट्रवादीकडे देऊन टाकला. बाळासाहेब ज्यांचा हरामखोर म्हणून उल्लेख करायचे, त्यांच्या दावणीलाच तुम्ही शिवसेना बांधली,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. दसऱ्यानिमित्त बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होते

आम्ही केली ती गद्दारी नाही, तर हा ‘गदर’ आहे, गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव. म्हणून आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांचे खरे शिलेदार आहोत,” असे सांगत शिवसेना वाचवण्यासाठी, हिंदुत्व वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. गेली तीन महिने मी राज्यभरात फिरतोय, आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लहान-थोर, ज्येष्ठ-श्रेष्ठ आम्हाला पाठिंबा देताहेत. जर आम्ही बेईमानी केली असती तर एवढे लोक सोबत आले असते का?,” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्ता नाही तर सत्य आणि सत्त्व महत्त्वाचे आहे. तुम्ही आम्ही सर्व बाळासाहेबांचे सच्च शिवसैनिक, खरे वारसदार आहोत. बाळासाहेबांचा खरा वारसदार हा जनसमुदाय आहे. वारसा हा विचारांचा असतो. आम्ही तो जीवापाड जपलाय. त्यामुळे विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहेत, हे महाराष्ट्राला समजले आहे. गद्दार आणि खोके याशिवाय यांना तिसरा शब्दच सापडत नाही. बाकी काही हे बोलणार नाहीत. कारण बोलण्यासारखे काहीच नाही. गद्दारी झाली हे खरे आहे, पण गद्दारी झाली ती २०१९ ला झाली. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले, त्या लोकांशी गद्दारी झाली,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

“सत्ता गेल्यानंतर आता तुम्हाला शाखाप्रमुख, गटप्रमुख यांची भेट घ्यावीशी वाटतेय, आता ते आठवलेत. ज्यांना पायरीवर चढू दिले नाही, आज त्यांच्या पायरीवर तुम्ही जात आहात. आज तुम्ही फिरायला लागलात, पण आता खूप उशीर झालाय. आता काही फरक पडेल, असे वाटत नाही. तुमचे ‘वर्क फ्रॉम होम’ होते, आमचे ‘वर्क विदाऊट होम’ होते. सातच्या आधी घरी जाण्याची आमची शिवसैनिकांची संस्कृती नाही. कोविड पाहिले, महापूर पाहिला तेव्हा हा रामदासभाई ट्रकच्या ट्रक भेट जाताना मी पाहिलंय. आमचे सगळे खासदार, आमदार झटत होते. तुम्ही फक्त फोटो काढत होता,” असा चिमटाही एकनाथ शिंदे यांनी काढला.

कटप्पा स्वाभिमानी होता -शिंदे

“मला तुम्ही भाषणात कटप्पा म्हणाले, अरे पण कटप्पा हा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आम्ही समोरून वार करणारे आहोत, तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत,” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

पीएफआयवर उद्धव गप्प का?

"शिवसेना देशभक्त, राष्ट्रभक्तांची आहे. देशविरोधी काम करणाऱ्यांना ठेचून काढू. पीएफआयबाबत ठोस आम्ही भूमिका घेतली. देशाच्या एकात्मतेला, अखंडत्वाला नख कुणी लावले तर सोडणार नाही. पीएफआयने देशाची सुरक्षितता धोक्यात आणली तरीही ते एक शब्द बोलले नाही.त्यांच्याविरोधात भूमिका घेतली नाही. कारण त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला वाईट वाटले असते", असा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर शिंदे यांनी टीका केली

तुम्ही बापाचे विचार विकले!

तुम्ही तर बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केलात, त्याला काय म्हणावे? खरे गद्दार कोण हे जनतेला समजलेय. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा कायम विचार केला. पण हिंदुत्वाचा विचार करून चूक केली, हे तुम्ही सर्वोच्च सभागृहात विधानसभेत सांगितले. २५ वर्षे आम्ही सडलो हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही. मुंबईचा बॉम्बस्फोट ज्या याकूब मेमनने घडवले, न्यायालयाने फाशीची शिक्षा ज्याला ठोठावली, ती फाशीची शिक्षा रद्द करणाऱ्या आमदाराला तुम्ही मंत्रिपद दिले, मुंबईकरांच्या जखमेवर किती मीठ चोळणार? आणि आम्हाला गद्दार म्हणता, मग सांगा कुणी केली गद्दारी? तुम्हीच गद्दार आहात. म्हणून जनतेने ठरवलेय, गद्दारांना साथ द्यायची की बाळासाहेबांच्या विचारांच्या शिलेदारांना द्यायची. महाराष्ट्रातली जनतादेखील तुम्हाला क्षमा करणार नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

logo
marathi.freepressjournal.in