शिवसेना लवचिक बनतेय; भाजपविरोधात सगळ्यांना सोबत घेऊन मोट बांधण्याची रणनीती

‘आयडॉलॉजिकल यू-टर्न’चा फटका पारंपारिक मतांना बसणार नाही याचीही काळजी उद्धव ठाकरेंना घ्‍यावी लागणार आहे
शिवसेना लवचिक बनतेय; भाजपविरोधात सगळ्यांना सोबत घेऊन मोट बांधण्याची रणनीती

जून महिन्यापासून शिवसेनेला धक्‍क्‍यावर धक्‍के बसले आहेत. इतके की उद्धव ठाकरे शेवटी म्‍हणाले की, आम्‍ही आता धक्‍केप्रुफ झालो आहोत. अनेक वाईट गोष्‍टी घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काही सुखद तुषारही अनुभवायला मिळत आहेत. कट्टर राजकीय विरोधक असलेल्‍या कम्‍युनिस्‍ट पक्षाची साथ, मराठी मुस्‍लीम सेवासंघाने दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि महात्‍मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी घेतलेली सदिच्छा भेट या सर्व घडामोडी उद्धव ठाकरे यांना निश्चितच सुखावणाऱ्या असतील, मात्र यानिमित्ताने शिवसेना लवचिक होत असल्‍याचे दिसत आहे. तसेच भविष्‍यात भाजपविरोधात छोट्या-मोठ्या पक्ष-संघटनांची मोट बांधण्याची देखील शिवसेनेची रणनीती असणार आहे, मात्र या ‘आयडॉलॉजिकल यू-टर्न’चा फटका पारंपारिक मतांना बसणार नाही याचीही काळजी उद्धव ठाकरेंना घ्‍यावी लागणार आहे.

विधानपरिषद निवडणुकांच्या दिवशीच शिवसेनेत बंड झाले. राज्‍यात सत्तांतरही झाले. शिवसेना पक्षाला दोन नावेही मिळाली. अनेक खळबळजनक राजकीय घडामोडी घडल्‍या. एखादा मोठा भूकंप झाल्‍यानंतर पुढील अनेक दिवस त्‍याचे ‘आफ्टर शॉक्‍स’ बसत असतात. तसेच राज्‍यातील राजकीय भूकंपानंतर अनेक आफ्टर शॉक्‍स रोज बसत आहेत, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना सुखावणाऱ्या तसेच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावणाऱ्या काही घडामोडी देखील घडत आहेत.

कम्‍युनिस्‍ट पक्ष हा शिवसेनेचा कट्टर राजकीय विरोधक पक्ष. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जेव्हा स्‍थापन केली तेव्हा ती पहिल्‍यांदा परळ-लालबाग या गिरणगावातच बहरली. गिरणगाव हा कम्‍युनिस्‍टांचा बालेकिल्‍ला. कम्‍युनिस्‍ट आणि शिवसैनिकांमधील संघर्ष हा केवळ तात्िवक नव्हता. त्‍याला रक्‍तरंजित किनारही होती. कॉम्रेड कृष्‍णा देसाई यांचा तर खून झाला होता. त्‍यानंतर गिरणगावातील लालबावटा शिवसेनेने हद्दपार करून भगवा फडकवला, मात्र आता त्‍याच कम्‍युनिस्‍ट पक्षाच्या नेत्‍यांच्या शिष्‍टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. मराठा मुस्‍लीम सेवासंघाने देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. महात्‍मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेऊन नफरत छोडो संविधान बचाओ अभियानात शिवसेनेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

भाजपसोबतची २५ वर्षे युतीत सडली असे म्‍हणत उद्धव ठाकरेंनी पारंपारिक राजकीय विरोधक असलेल्‍या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्‍थापन केले. तेव्हाच त्‍यांच्यावर राजकीय भूमिका बदलल्‍याचा आरोप झाला होता. सातत्‍याने विरोधक असलेल्‍या काँग्रेस-राष्‍ट्रवादीसोबत त्‍यांनी अडीच वर्षे सुखाचा संसारही केला.

वैशिष्‍ट्य असे की, या तीन पक्षांतील अंतर्गत विरोधामुळेच सरकार कोसळेल, असा दावा सातत्‍याने भाजप नेत्‍यांकडून केला जायचा. मात्र या तीन पक्षांत कधीच कुरबुरी झाल्‍याचे दिसून आले नाही. काँग्रेसचे दिग्‍गज नेते असोत वा तत्‍कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार असोत, यांनी कायम उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या काळात सहकार्यच केल्‍याचे दिसून आले. शेवटी पक्षातल्‍याच नेत्‍यांनी सरकार कोसळवले. त्‍यामुळे विरोधी पक्षातल्‍या नेत्‍यांना आपलेसे करण्याची हातोटी उद्धव ठाकरेंकडे असल्‍याचे दिसून आले.

पुढे जर यश मिळवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांना स्‍वतःचा पक्ष नव्या जोमाने उभा तर करावाच लागणार आहे, पण त्‍याचसोबत राज्‍यातील अनेक पॉकेट‌्समध्ये ताकद असणाऱ्या छोट्या-मोठ्या पक्षांना, संघटनांना देखील सोबत घ्‍यावे लागणार आहे.

आता त्‍याचीच सुरुवात झाली आहे. एका बाजूला कम्‍युनिस्‍ट पक्षाकडून मिळणारा पाठिंबा हे उद्धव ठाकरेंचे यश म्‍हणून पाहिले जात असताना या आयडॉलॉजिकल यू-टर्नमुळे शिवसेना ठाकरे गटाचा पारंपारिक मराठी, हिंदू मतदार तर दूर जाणार नाही ना, याची देखील कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे. पुढच्या दोन वर्षांत याबाबत उद्धव ठाकरे यशस्‍वी होतात की नाही हे दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in