
खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयात विशेष वागणूक देताना एमआरआय कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा घेवून जाण्यास आणि फोटो काढू देण्यास परवानगी देणाऱ्या लीलावती रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी वांद्रे पश्चिम पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा. डॉ. मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयाला याबाबत जाब विचारला होता. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार करण्याचे त्यावेळी त्यांनी प्रशासनास सुनावले होते. मंगळवारी या चौघांनी वांद्रे पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
रुग्णालयाच्या छापील नियमावलीनुसार रुग्णालयात फोटोग्राफी करण्यास परवानगी नाही, असे असताना नवनीत राणा यांची एमआरआय चाचणी सुरू असताना त्याचे फोटो समाज माध्यमात आल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर, राणा यांचे हे फोटो कोणी काढले त्याची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषीवर कारवाई व्हावी, एमआरआय कक्षाच्यामागे ऑक्सिजन प्लांट आहे. काही दुर्घटना घडली असती तर रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्याला जबाबदार कोण राहिले असते? आदी सवाल या तक्रारीत करण्यात आले आहेत.