कर्नाक पुलावरून शिवसेना, मनसेचे एकत्र आंदोलन

हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारविरोधात आंदोलन छेडलेले असतानाच, आता कर्नाक पुलाच्या मुद्द्यावरूनही या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे आंदोलन केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
कर्नाक पुलावरून शिवसेना, मनसेचे एकत्र आंदोलन
Published on

मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारविरोधात आंदोलन छेडलेले असतानाच, आता कर्नाक पुलाच्या मुद्द्यावरूनही या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे आंदोलन केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

कर्नाक पुलाचे काम पूर्ण होऊनही तो नागरिकांच्या सेवेन न आल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी आंदोलन केले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला तसेच पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र अद्याप हा पूल सुरू झालेला नाही. १० जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते, मात्र आता जुलै महिना सुरू झाला तरी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. ११ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्या वतीने कर्नाक पुलाच्या उद्घाटनासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. यात विभागप्रमुख संतोष शिंदे, मनसे उपाध्यक्ष अरविंद गावडे, महिला विभागसंघटक युगंधरा साळेकर तसेच इतर शिवसेना-मनसे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सहभाग घेतला.

१२५ वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्याने ऑगस्ट २०२२ मध्ये तो पाडण्यात आला. मुंबई महापालिकेकडून या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले. मध्य रेल्वेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून, रेल्वेच्या हद्दीतील लांबी ७० मीटर इतकी आहे. महापालिका हद्दीतील पोहोच रस्त्यांची एकूण लांबी २३० मीटर असून, पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेला १०० मीटर इतकी आहे. कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम १० जून या नियोजित कालावधीतच पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, हा पूल अद्याप नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in