शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट जारी करून १८ जुलैला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्या यांच्या सहभाग असल्याचा आरोप केल्याने अडचणीत सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. न्यायालयात सोमवारी गैरहजर राहिल्याने शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट जारी करून १८ जुलैला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच खा. राऊत यांनी किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला. मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून हा घोटाळा झाला असून एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने हा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

खा. राऊत यांनी खोटे आरोप करून आपली बदनामी केल्याचा आरोप करून मेधा सोमय्या यांच्यावतीने अ‍ॅड. विवेकानंद गुप्ता, अनिल गलगली यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना समन्स बजावून ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

सोमवारी या दाव्यावर सुनावणी झाली. यावेळी राऊत हे न्यायालयात गैरहजर होते. याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना जामीनपात्र वॉरंट जारी करत १८ जुलैला सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in