
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या वादावर तोडगा निघत नसल्याने अखेर ठाकरे गट शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी देण्याचे पालिका प्रशासनाला आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. शिवसेना आणि शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यावतीने अॅड. जोएल कार्लोस यांनी दाखल केलेल्या या याचिकेची न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने गुरुवार, दि. २२ सप्टेंबरला सुनावणी निश्चित केली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा कोणाचा, असा वाद सुरू असतानाच सेनेच्या वतीने मुंबई महापालिकेच्या दादर जी-उत्तर विभागात दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, असा अर्ज २२ ऑगस्टला दाखल केला. तर त्यानंतर शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी ३० ऑगस्टला अर्ज केला. या अर्जावर अद्यापपर्यंत मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. अखेर शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पालिकेला परवानगी देण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. ही याचिका अॅड. जोएल कार्लो यांनी न्या. रमेश धनुका आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजीपार्कवर दसरा मेळावा साजरा केला जातो. ही५० वर्षांची परंपरा आहे. याचा ठरावीक कार्यक्रमासाठी वापर करण्यासाठी काही दिवस राखून ठेवले आहेत. त्यात २०१६ च्या सरकारच्या आदेशात दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी राखीव ठेवला. शिवसेनेने नियमानुसार पूर्व परवानगी मागूनही महापालिकेने त्यावर कोणतेच उत्तर दिलेले नाही. पालिका प्रशासनावर सरकारचा दबाव असल्याने ही परवानगी दिली जात नसल्याचा आरोप करून कार्यक्रमाच्या तयारीसाठी याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी.