उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का ; १२ खासदार शिंदेंसोबतच्या ऑनलाइन बैठकीला हजर

सर्व खासदार शिंदेगटात सहभागी झाल्याची घोषणा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का ; १२ खासदार शिंदेंसोबतच्या ऑनलाइन बैठकीला हजर

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकामागे एक धक्के दिले जात आहेत. शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदेगटात सामील होणार हे निश्चित झाले आहे. या १२ खासदारांनी शिंदेंसोबतच्या ऑनलाइन बैठकीला सोमवारी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते या खासदारांशी बैठक घेणार आहेत. त्यानंतर हे सर्व खासदार शिंदेगटात सहभागी झाल्याची घोषणा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगटाची सोमवारी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे जवळपास १२ खासदार ऑनलाइन उपस्थित होते. शिवसेनेचे लोकसभेत महाराष्ट्रातून १८ खासदार आहेत. एक खासदार कमलाबेन डेलकर या दादरा-नगरहवेलीतून पोटनिवडणुकीतून निवडून आल्या आहेत. या सर्व खासदारांपैकी अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, गजानन कीर्तिकर, राजन विचारे, संजय जाधव आणि विनायक राऊत हे सहा वगळता सर्व खासदार शिंदे यांच्यासोबत असल्याचे या बैठकीमुळे उघड झाले आहे. डेलकर यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. शिंदेगटात सामील होणाऱ्या खासदारांबाबत दिल्लीत मंगळवारी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी ठाणे, पालघर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर, नाशिकमधील बहुसंख्य विद्यमान नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेण्यात यश मिळवले आहे.

त्यामुळे शिवसेना खिळखिळी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शिवसेनेचे १२ खासदार आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in